Sunday, 27 February 2011

भाऊ साहेबांची बखर ---लोकशाही जिंदाबाद!!!







एक आटपाट नगर होते तिथे जगातील सर्वात अदभूत अशी ४ खांबांवर उभी असणारी वास्तू होती , अहो कौरवांचा मोरू करायला पांडवानी बांधलेल्या मयसभेसारखी ही आश्चर्याचे धक्के देणारी ही वास्तू असल्याने तिला अदभूत म्हणले गेले. देशोदेशीचे विचारवंत , विद्वान, विदुषी ( विदूषकाचे स्त्रीलिंगी रूप माहित असल्यास कळवणे) या नगरात येवून त्या वास्तूच्या करामतीची अनुभूती घेवून त्या वास्तू विषयी आपापली मत मतांतरे व्यक्त करू लागले. त्यातून मतांचा गलबला निर्माण होवू लागला या गलबल्यामूळे केवळ 'मत' हेच या वास्तूचे एकमेव महत्वपूर्ण अंग असल्याचे पुढील शतकातील लोक म्हणू लागलील अशी शक्यता काही धुरिणांनी व्यक्त केली मात्र अधिक अभ्यासांती विधिमंडळ , न्यायमंडळ , कार्यकारी मंडळ आणि प्रसारमाध्यमातील मंडळी असे त्यावास्तुचे ४ खांब देखील या वास्तूच्या जडणघडणीत महत्वाचे असल्याचे आढळून आले. त्या वास्तूच्या शिर्षभागी असणारे 'लोकशाही' हे नाव देखील दिसून आले.

ही सर्व साठ उत्तराची कहाणी अर्धी नुर्धी जशी जमेल तशी लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी इलेक्ट्रोनिक प्रसारमाध्यमांनी आपापली 'बोन्डूके' सांभाळीत बाईट देण्यास सुरवात केली. ते वर उल्लेखित ' धुरीण' म्हणजे हीच मंडळी असल्याचेही निदर्शनास आले आहे. प्रिंट माध्यमातील बोरुबहाद्दर देखील ही कहाणी चितारण्यासाठी आपला मीठ मसाला घेवून पुढे सरसावली.

कार्यकारी मंडळ हा खांब वास्तूच्या अग्रभागी असल्याने लोकशाहीचा चेहरा म्हणजे आपणच हे दर्शविण्यासाठी अतिउत्साहाने पुढे पुढे करू लागला. कार्यकारी मंडळ ही अधिकार रूढ लोकांची बाजू असल्याने विरोधकांचा या दिखावूपणामुळे तिळपापड झाला.त्यांनी विधिमंडळ या खांबाद्वारे नरसिन्हासारख्या डरकाळ्या फोडायला सुरवात केली. संसदीय आयुधे वापरणारा हा खांब मग पेपरवेट, कागदी बाण यांसारख्या आयुधांचा वापर करून आपल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या डरकाळ्यामूळे वास्तू हद्रायला लागली . हा तमाशा दूरपर्यंत चलचित्राद्वारे पोहचविण्यासाठी मिडीयावाला खांब देखील उत्सुक झाला आणि दोन खांबांच्या भांडणात कळलाव्या नारदाची भूमिका बजावू लागला , अर्थात सर्वच मिडीयावाले नारदाच्या भूमिकेत नव्हते मात्र त्यांचा गोबेल्स तंत्राचा अभ्यास कमी पडला असावा त्यामुळे त्यांची अडगळीची खोली झाली होती. तार स्वरात भांडण करणारे ते दोन खांब आणि कळीच्या नारदाकडेच सर्वांचे लक्ष होते त्यामुळे यात ते अडगळीतील काही जन आणि ज्याच्या समोर हा तमाशा चालू होता तो 'आम आदमी' यांचा क्षीण आवाज कोणालाही ऐकू येत नव्हता.

त्या वास्तूच्या समोरच आर के लक्क्षुमनांनी रंगवलेले अनेक ' कॉमन मेन ' विषन्न , पिचलेल्या , मारून मुटकून बसवल्यासारख्या अवस्थेत हा सर्व तमाशा पाहत होते. प्रचंड दबाव असला तरी कार्यकारी मंडळाचा खांब शांत का बसत नाही या विचाराचा भुंगा तिथे उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या कानात गुणगुणून गेला पण त्यांना काय माहिती या सर्व राजावाल्या, रामवाल्या आणि राडीयावाल्या मंडळीचे आतून साटेलोटे आहे आणि त्यामुळे 'तेरी भी चूप मेरी भी चूप असाच सर्व मामला होता.

मग आणीबाणीची परिस्थिती (इंदिरा गांधी वाली नाही) आली की शंकर जसा तिसरा डोळा उघडतो तसे डोळा उघडून न्यायमंडळ या खांबाने कार्यकारी मंडळाची पाळता भुई थोडी करायला सुरवात केली . काळा पैसा काय, CWG काय, २ G काय सगळ्यामुळे कार्यकारी मंडळाची दाणादाण उडाली अहो देशमुखांच्या गढीला देखील हादरे बसू लागले. पामोलीन तेलावरून कार्यकारी मंडळाचा पाय घसरला आणि ते तोंडघशी पडायची वेळ आली, थोमास साहेब देखील दाद लागू देईनात संकटात सापडल्यावर कोण कसा वागेल याची प्रचीती त्या मंडळाला येवू लागली . अहो शेवटी एकेकाचा काळ असतो. या सर्वांमुळे वास्तूचा समतोल ढळायला लागला त्याचे सौंदर्य , अदभूतता यांच्या समोर प्रश्नचिन्ह उभे ठाकले. हा असमतोल दूर करून निर्माण झालेली पोकळी भरण्यासाठी न्यायमंडळ 'न्यायिक पुनर्विलोकन', 'जनहित याचिका ' या शस्त्रांचा वापर करू लागले पण अति तिथे माती या न्यायाने निर्माण झालेला असमतोल दूर होणे दूरच पण ती लोकशाही नामक वास्तूच खिळखिळी होवू लागली. आता ही वास्तू आपल्या अंगावर कोसळेल आणि त्याखाली सापडून आपला अंत होईल असा ' आम आदमीला ' भास होवू लागला. फार पूर्वी लिंकन नामे प्रभृतीने या वास्तूविषयी लिहिताना ही वास्तू म्हणजे ,लोकांची ,लोकांसाठी , लोकांनी बांधलेली वास्तू असे वर्णन केले होते. आम आदमीला त्यामुळे असेही वाटू लागले ही वास्तू 'लोकांसाठी ' म्हणजे दुसऱ्या कोणासाठी तरी असून आपला त्यांचा काही संबंध नाही.

या सर्व पार्श्वभूमीवर आटपाट नगरजवळील इजिप्त , ट्युनिशिया या भागात असलेली 'हुकुमशाही ' नावाची एका खांबावर उभी असलेली वास्तू नगरवासियांनी पहिली होती. काहीजण त्यावास्तुच्या बाह्य आकर्षणावर फिदा पण झाले होते पण आणीबाणी कालखंडात ( आता इंदिरा गांधी वाली) त्यांनी त्याची चुणूकही अनुभवलेली होती. 'दुरून डोंगरे साजरे' या म्हणीची प्रचीती तेंव्हा आलेला असल्याने आपल्या नगरातील 'लोकशाही' नामक वस्तूच्या अस्थिर अवस्थेवर काय अक्सीर इलाज सापडेल या विषयी आम आदमी इतर खांबा समवेत चर्चा विनिमय करू लागला. त्यांच्यापर्यंत इजिप्त मधील लोकशाहीवादी क्रांतीची बातमी देखील पोहोचल्यामुळे सर्वच जणांना त्यातून योग्य तो संदेश मिळाला होता.

अशावेळी थंड वाऱ्याची झुळूक यावी त्याप्रमाणे त्यांना आशेचा मार्ग लोकशाहीचा पाया असणाऱ्या 'संविधानरुपी' ग्रंथाद्वारे दृष्टीक्षेपात आला. आम आदमीने विचार केला जरी या ४ खांबामध्ये तमाशा रंगत असला तरी नुकताच अंमळ उशिरा का होईना पण कार्यकारी मंडळाचा नेता आपल्याशी थेट बोलला आहे , विधिमंडळ देखील आरडा ओरडा थांबवून संवाद साधण्यावर भर देत आहे , मिडिया कडून देखीलकाही आगळीक होत असली तरी त्या ग्रीस मधील 'मिडिया' या देवते प्रमाणे अद्दल घडवण्यासाठी हा मिडिया आपल्याच मुलांचा जीव घेण्याइतका निष्ठुर झालेला नाही त्यामुळे या सर्वांना योग्य तऱ्हेने वेसण घातले तर 'लोकशाही' या वास्तूची अदभूतता कायम राहील. या उपायानुसार आम आदमीने त्यावास्तुच्या 'Walls ' बांधायला घेतल्या , मग काही जणांनी त्या 'Walls ' चा उपयोग वास्तूच्या कामकाजाबद्दल, त्याच्या खांबा विषयी स्टेटस लिहायला चालू केले, त्यावर कमेंट्स टाकता येतील , लाईक , अनलाईक अशा गोष्टी करता येतील ही सोय केली. काही जन यातील ' scrap ' मालातून देखील जनजागृती करता येईल अशी व्यवस्था करून सारखे ट्विट ट्विट करू लागले. विल्यम डटन नावाच्या समाजशास्त्राद्याने तर या नवीन शोधला त्या वास्तूचा 'पाचवा खांब' म्हणावयास सुरवात केली. सोशल नेटवर्किंग असे त्या खांबाचे नाव पडले.

या आटपाट नगराचा पुर्वेइतिहास जगाला मार्ग दाखवण्याचा होता , त्यामुळे हताश न होता आव्हानांना पुरून उरून 'लोकशाही' या वास्तूला जतन करणे आवश्यक असल्याचे नगरवासीय आणि त्या वास्तूच्या घटकांना देखील उमगले होते कारण कोणताही विसंवाद , कटुता दूर करण्याचा मार्ग त्या वास्तूतून जाणारा असल्याने त्यांनी 'हुकुमशाही ' या वास्तूचे हिंसा हे फिचर न स्वीकारता संविधानाच्या अधीन राहून व्यक्ती स्वातंत्र्य वर आधारित ' सुसंवाद' याचाच स्वीकार केला आणि लोकशाही ही वास्तू म्हणजे केवळ मतांचा गलबला नसून आम आदमी हाच त्या वास्तूच्या अस्तित्वाचा प्राथमिक आणि एकमेव स्त्रोत असल्याचे सर्वांना दाखवून दिले.