Wednesday, 20 April 2011

' सई रे सई ' राडा रॉक्स


चित्रपट पहाणे हि आपली सामाजिक आणि सांस्कृतिक जबाबदारी आहे का? बहुतांशी याचे उत्तर नाही असेच आहे मी मात्र ते माझे कर्तव्य आहे या प्रेरणेने चित्रपट पहात आलो आहे.अगदी लहानपणापासून चित्रपट ही माझी कमजोरी आहे , कॉलेज च्या दिवसात तर शनिवारी 'अलका' मध्ये इंग्रजी आणि इतरत्र कुठेही हिंदी किंवा मराठी (प्रभात) नित्यनियमाने पहिले आहेत. अर्थात त्यावेळी तिकीट देखील कमी होते. मंगला च्या सकाळच्या शो चे तिकीट तर १० रु. होते. आज देखील मी पूर्वी इतक्या नित्य नियमाने नाही पण तरी महिन्या काठी २ चित्रपट थेटरात आणि मग वेळ मिळेल तसे घरी पाहतो. यावरून आपल्या लक्षात आलेच असेल मला पिक्चर पाहण्याची दैदिप्यमान परंपरा आहे ...... परंपरा ही दैदिप्यमान किंवा गौरवशाली का असते काय माहीत पण असते तर त्याच विषयावर मला काही सांगायचे आहे.

चित्रपटाचे परीक्षण वाचून ते पाहण्याची खोड मला असली तरी बिनदिक्कत देखील चित्रपट मी पाहत आलो आहे , हे परीक्षणाचे खूळ या मागील ३ ते ४ वर्षातील आहे . खर तर माझ्या धैर्याची तुम्ही 'सराहना' करायला पाहिजे परीक्षणात भिक्क्क्कार म्हणलेल्या अनेक पिक्चरला मी गेलेलो आहे.' कॅश ' नामक तद्दन फालतू पिक्चर देखील मी पहिला आहे . क्रांती शहा चा 'गुंडा' तसेच कमल सदना , अनिल धवन , राहुल रॉय, किमी 'कपडे' काटकसरकर यांचे देखील मी पिक्चर मी पहिले आहेत. सपेरा, लुटेरा, मुडदे कि जन खतरे मी , पापी हसीना , खून कि होली मराठी म्हणाल तर नाथा पुरे आता , बघ हात दाखवून असले पिक्चर पण मी पाहिले.

एवढे नमनाला तेल लावल्यावर मुद्द्यावर यायचं म्हणजे मी नुकताच ' राडा रॉक्स' हा मराठी चित्रपट पाहिला. काही दिवस आधीच संतोष जुवेकर या मराठीमधील नटाने मराठीत पण चकाचक , रॉक, पॉप, हाणामारीचे असे नवे सिनेमे येत असतात प्रेक्षकांनी त्याला प्रतिसाद द्यावा केवळ 'विनोद' म्हणजे मराठी चित्रपट नव्हे असे आपले खुपणे क्रांती रेडकर आणि अवधूत रावांच्या साक्षीने सांगितले होते. त्याला स्मरून हा 'राडा रॉक्स' नावाचा हातोडा मी आणि माझ्या भावाने डोक्यात, मनावर , डोळ्यांवर सगळीकडे मारून घेतला आणि काळानिळा झालो . कळस म्हणजे रविवारची दुपार ३.१५ वाजलेले अशावेळी मस्तपैकी ताणून द्यायची सोडून केवळ आणि केवळ 'धैर्याच्या' बळावर हा चित्रपट पहायला आम्ही मल्टीप्लेक्सात पावूल टाकले , आजूबाजूला मॉल मधल्या कन्यकांकडे कानाडोळा करून चित्रपटगृहात घुसलो . खरतर या धैर्यासाठी त्या मौटन ड्यू, थम्प्स अप सारख्या जाहिरातीत आम्हाला काम द्यायला पाहिजे तेवढेच पैसे तरी मिळतील आणि ते म्हणतातच न 'डर के आगे जीत है ' पण तसले काही आमच्या बाबतीत झाले नाही .

ढन ढन म्युझिक च्या आवाजात सुरवातीला दिलेला एक इशारा नजरेआड जाण्याआधी मी वाचला ' हा चित्रपट पाहण्यापूर्वी आपले डोके घरी विसरून या , या कथेतील व्यक्तिरेखांचा वास्तविक जीवनाशी संबंध नाही मात्र प्रत्यक्षात कोणी आढळल्यास त्याला जवळच्या मनोरुग्णालयात सोडावे' खरेतर ही धोक्याची घंटा होती पण असेल नेहमी सारखीच सूचना म्हणून तिला मी धुडकावून लावली. चित्रपटातील कलाकारांची नामावली येवू लागली सगळी अपरिचित नावे पराग पाटील , उदय नेने, निशा परब वगैरे ....आणि ते पूर्वीच्या चित्रपतात सर्वात शेवटचे नाव 'प्राण' चे असेल तर 'And Pran ' असे देत त्या थाटात ' आणि सई ताम्हणकर ' असे नाव दिले होते कारण इतर अपरीचितात तिचेच नाव आणि चेहरा परिचित होता. सनई चौघडे वगैरे चा अनुभव पाठीशी असल्याने थोडी आशा होती , बाकी नवीन असली तरी एक संधी द्यायला काय हरकत होती. चित्रपटगृहात मोजून १० माणसे होती ....... कोणत्या तरी कॉलेज भोवती सुरवातीची दहा मिनिटे निर्मात्याने वाया घातली मास्तरला कमी एकू येते असे सांगून नवीन विद्यार्थ्यांना जोरात बोलायला लावणारा आणि त्यातून मास्तर , ते नवीन विद्यार्थी यांची का खरतर माझी फिरकी घेणारा हा सई बाईंचा ग्रुप नंतर मग एका पोराला त्रास देतो तो मास्तर निघतो असले पांचट प्रकार चालू होते. 'सुश्मिता सेन ' मै हु ना ! मध्ये वर्गात आल्यावर कसे आल्हाददायक वाटायचे पण सुश्मिता च्या कोसो दूर असलेली एक बाई सुश्मिताची आठवण करून देईल असा उपटसुंभ विचार या सिनेमाच्या दिग्दर्शकाच्या मनात आला या वरून आपण खिंडीत सापडलो आहोत याची जाणीव झाली . असल्या प्रकार नंतर तो कॉलेजचा प्रिन्सिपॉल ज्याला सतत कोणत्या न कोणत्या अभिनेत्याने पछाडलेले असते जसे राजकुमार , देव आनंद , शोलेचा ठाकूर इत्यादी. असल्या या कॉलेजात सई बाई आणि त्यांची चांडाळ चौकडी हातात गिटार घेवून फिरत असते यावरून आपल्याला काही अर्थबोध होत नाही . मग उगीच कॉलेजमधले दोन विरोधी गट एक राजपाल यादवचा आणि दुसरा राज ठाकरे ची भ्रष्ट नक्कल करणारा इसम . स्मिता ठाकरे आहे ना निर्माती बरोबर आहे काढणारच उट्टे, पैसे पाहिजेत ना शिवसेने कडून .

अरररारा काय रे ते राजपाल चे मराठी आणि त्याचे पाचकळ विनोद , सुरवातीच्या २० मिनिटानंतर मी पिक्चर कडून अपेक्षा सोडून दिली , इतरांनीही दिली असावी कारण १० जणांपैकी ६ जण उठून निघून गेले . आम्ही मात्र तसेच 'धैर्य ' आहे ना आमच्याकडे . पुढे अर्धा चित्रपट झाला तरी मला पिक्चर चा उद्देशच कळेना शेवटी दिग्दर्शकाला माझी दया आली असावी सई आणि तिच्या ग्रुपला एक रॉक अल्बम काढायचा आहे आणि त्या साठी हा सगळा खटाटोप. तिच्या ग्रुप मधील एक जण सोडून ( काय बरे त्याचे नाव जावू दे कशाला उगाच त्रास )सगळे एक जात श्रीमंत ... सिनेमाचा हिरो पराग पाटील याच्या विषयी काय बोलावे ....पिक्चर मध्ये काम करण्यासाठी उत्तम संवादफेक करता आली पाहिजे हे याच्या गावीही नसावे , त्याने फक्त संवादफेक मधील 'फेक' एवढेच एकले असावे पठ्या नुसती मराठी मिश्रित इंग्रजी वाक्यांची फेकाफेक करत होता. त्यांचा एक मित्र गरीब दाखवला आहे तेवढाच आपला 'इमोशनल टच' , अभ्यास वगैरे बाबत बेफिकीर असणारा हा, असो बापडा मी तरी कुठे अभ्यास एके अभ्यास करतो म्हणून तर पिक्चर ला आलो होतो ....हे साहेब घरच्यांचे बोलणे खात असतात त्यामुळे एका BPO मध्ये रात्री नोकरी धरतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडून देतात आणि अल्बम बनवायचाच म्हणून आपले वाटोळे करायला येतात . याची आई घरकाम करून घर चालवते वडील अंथरुणाला खिळलेले ..भांडी, झाडलोट करून घर चालवणारी याची आई हे सर्व करताना आपल्या भरजरी साडीला मिरवायला मात्र विसरत नाही.

यांचा अल्बम पैश्या पायी अडतो तेंव्हा कॉलेज मधील ते दोन गट यांना पैसे देवू करतात अट एकच त्यांच्या ग्रुप साठी कॉलेज निवडणुकीत प्रचारगीत लिहून द्यायचे . सई बाईंच्या ग्रुपचा हिरो अजून एकाला विश्वासात घेत दोन्ही गटांना प्रचारगीत देण्याचे मान्य करतो. साहेब गाणे लिहून दोन्ही गटांना गीते लिहून CD देतात मात्र देताना अदलाबदल करतात झाले आता 'बदले कि आग ' चित्रपटवाल्यांची फेवरेट कन्सेप्ट. पण हाय रे दुर्दैवा आता हे बदला वगैरे घेवून पिक्चर संपेल असे वाटले पण नाही अफजलखानाने जसा शिवाजी महाराजांना मारण्याचा विडा उचलला होता तसा या 'राडा रॉक्स' च्या टीमने आमच्या मेंदूचा पार पार भुगा करून टाकायचा विडा घेतला होता. हे सगळे वीर मग एका रियालिटी शो मध्ये जातात .

या रियालिटी शो चे सुत्रसंचलन करणारी भार्गवी चिरमुले म्हणजे आपल्या नामोहरण करण्यासाठी उगाच वेडेवाकडे हावभाव करणारे एक अस्त्र आहे, काय ते बोलणे , चालणे अर्रेरे .....पण काय करता १०२ रु प्रत्येकी दिले होते ना त्यामुळे पाहिले पुढे . येथे येणाऱ्या प्रत्येक ग्रुप चे आचरट चाळे पाहताना जीव नकोसा होत होता त्यात त्यांच्या परफोरमंस वर जजेस ची मते शंकर महादेवन , जुही चावला , अन्नू मलिक , सुखविंदर सिंग अशी मात्तबर मंडळी..... अनु मलिक मात्तबर का? या बाबत शंका आहे . शंकर महादेवन चे मराठी सोडले तर इतर लोकांचे मराठी म्हणजे आपली थट्टा. त्या सुखविंदर सिंग चे मराठी म्हणजे ५ वर्षाच्या मुलाला ३ वर्षाच्या मुलाचे कपडे जसे ओढून ताणून बसवता येतील त्या दर्जाचे ओढूनताणून बोललेले .जावू द्या त्यांना तरी काय दोष द्यायचा म्हणा सई ताम्हणकर बाईंचे इंग्रजी मधील डायलॉग डिलिव्हरी ठीक गटात मोडणारी मात्र मराठी शिव शिव शिव ........वास्तविक सांगली मध्ये जन्मलेली , वाढलेली ही बया लंडन सोडून आपण काही पाहिले नाही अश्या अविर्भावात मराठी बोलत होती.सांगलीतले इतर सगळे सोडून सांगलीच्या आयर्विन पुलाच्या आयर्विनचे गुण घेतले वाटते. पराग पाटील , निशा परब हे लंडन च्या ऐवजी बर्मिंगहम मधून आले असतील त्यामुळे त्या सुखविंदर ला काय दोष देणार तो तर बिचारा पंजाबातील आहे. या रियालिटी शो मध्ये कुडकेश्वर ग्रुप आहे .... घाणीतून नुकताच उठलेला डुक्कर जितका किळसवाना वाटेल तितकेच किळसवाने प्रकार ही मंडळी करत होती. यांचा डान्स म्हणजे रस्त्यावर झोपलेले कुत्रे जसे आपले हात पाय हलवते तसे हात पाय हलवणे म्हणजे डान्स.

एवढा सगळे करून त्या रियालिटी शो मध्ये दुसराच ग्रुप जिंकतो कारण स्पॉनसरचे राजकारण आडवे येते. हा निकाल ऐकल्यावर भार्गवी बाई चालू कार्यक्रमात 'बुलशिट' म्हणून ओरडतात आणि प्रत्येक जज आपापली प्रतिक्रिया देवू लागतो. मलिक साहेब तर काय म्हणाले ते त्यांना तरी कळले का ... ते म्हणतात जनतेने मत देण्यापूर्वी हा विचार करावा कि लय लय होती है, ताल ताल होता है , सूर सूर होता है '......मला तर काही कळले नाही ...तुम्हाला ? एवढा अत्याचार कमी कि काय म्हणून त्या रियालिटी शो मधून वापस आल्यावर भुकेल्या कुत्र्यासारखे या गटाची वाट बघणारे ते कॉलेजातील दोन गट टपून बसलेले असतात त्यांचा उपदेश आपल्याला ऐकावा लागतो. या पिक्चर मध्ये पोलिसांना फक्त याच कॉलेजातली लफडी सोडवण्यासाठी नेमले असावे अशी शंका येते. काय ते कॉलेज , त्यातील प्राध्यापक आणि ही असले वेडी बिद्री मुले. हे लोक वापस येतात तेंव्हा सुनील शेट्टी साहेब पिक्चर मध्ये येवून त्या दोन्ही गटांना समजावतात आणि सर्व गोष्टी गोड होतात.

त्यानंतर सोमवारचा पेपर वाचला कोथरूड मध्ये सोसायटीमध्ये या चित्रपटाशी संबंधित कलावंतानी राडा केल्याप्रकरणी ........बरोबर आहे असले राडे करायची सवयच जडली असावी त्यामुळेच तसला पिक्चर बनवला आणि नंतर हा घोळ ...लोक तरी किती सहन करणार .....यांचा खुलासा काय मी चांगल्या घरातील मुलगी आहे ...अग दाखव न मग तशी लक्षणे .....तो संजय दत्त पण चांग्लायचं घरातला होता आई-वडील प्रख्यात पण केली ना त्याने घाण, राहुल महाजन पण आहेच ....

तर असला हा 'सई रे सई ' राडा .........सई बाई पुढे थोडे अभिनयाचे आणि कसे वागायचे याचे शिक्षण घ्या आणि आपल्या मित्रानाही सांगा ......
.
.
.
.
तर शेवटी काय पुढच्या शुक्रवारी कोणता पिक्चर येणार !!!!! गूगल करतो .....असेलच मी तिकडे कोठे तरी शेवटी काय ही जित्याची खोड मेल्याशिवाय जायची नाय उगाच नाही म्हणालो माझी चित्रपट पहाण्याची दैदिप्यमान कारकीर्द आहे .............