Sunday 26 December 2010

नागपूर पुराणम मार्गे विधिमंडळ !!!



'स्पार्क' जॉईन केल्यानंतर पहिलाच मोठा गड चढायचा होता (सर करणे दूरच )तो म्हणजे नागपुरातील विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन. अधिवेशन १ डिसेंबरला चालू होणार होते मात्र हिवाळी अधिवेशनाचा पूर्वानुभव लक्षात घेता अधिवेशनाचा पहिला आठवडा 'गोंधळी' या लोककलेला समर्पित केला पाहिजे या भावनेत सर्व सदस्य असतात त्यामुळे आम्ही ऑफिसातील पाच जण दुसऱ्या आठवड्याच्या सुरवातीपासून नागपुरात शड्डू ठोकण्यासाठी मुंबईहून ५ डिसेंबरला रेल्वेने निघालो ( अहवालांच्या भल्यामोठ्या ब्यगसहित वरळीतील ऑफिस ते सी एस टी चा गाठलेला प्ल्यटफॉर्म १७ या प्रवासाविषयी नंतर कधीतरी).

राज्याशी संबंधित विविध विषय , धोरणे यांचा अभ्यास करून त्यातील स्वागतार्ह तरतुदी,त्रुटी, पर्यायी मार्ग अहवालरूपाने धोरणकर्त्यांना ( आमदार , मंत्री ) सादर करणे हे आमच्या कामाचे थोडक्यात स्वरूप आणि त्यासाठीच अहवालांचा बाडबिस्तरा घेवून भारताच्या मध्यबिंदुकडे प्रयाण केले होते. महाराष्ट्रात सामील होताना तत्कालीन मध्य प्रांतातील वऱ्हाड भागाच्या संबंधाने झालेल्या 'नागपूर करारा'न्वये महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन या संत्रानगरीमध्ये भरते. दारिद्र्य ,पाटबंधारे,शिक्षण इत्यादी विषयांवरील अहवाल आम्ही बाळगून होतो, मी या इत्यादींमधील महाराष्ट्र शासनाच्या 'सेझ' आणि शहराचे वास्तुशास्त्रीय स्वरूप ठरवण्यासंबंधीच्या ' इमारतीचे दर्शनी भागाची दुरुस्ती' या दोन विधेयकांवर अहवाल तयार केले होते. येथे निघण्यापूर्वी नागपूरच्या थंडीचा मुंबईकरांना बाऊ असल्याने किमान तापमान पहिले होते ते तर तब्बल २५ सेल्सियस त्यामुळे मी स्वेटर वगैरेंचा नादच सोडला होता ( स्वेटर ब्यग मध्ये जास्त जागा घेते , हा देखील त्यामागचा विचार ) . नागपुरात उतरल्यावर जाणवले मी येण्याचा मुहूर्त पाहूनच निसर्गाने आपला पारा वरखाली करायचा ठरवले होते , तापमान तब्बल ७ सेल्सियस ने खाली उतरलेले , देवेंद्र फडणवीस तर म्हणाले सुद्धा " नागपूरची गेलेली थंडी घेवून आला तुम्ही लोक ".

आता नागपुरात पोहचल्यावर पहिले काम होते लॉज गाठून निवांत डुलकी मारून फ्रेश होण्याचे , ते सोपस्कार झाल्यानंतर मला जेवणाएवढा आवश्यक असणारा पेपर आहे का ?म्हणून रिसेप्शनला विचारले तर आजचा नाही कालचा आहे देवू का ? असे तेथल्या माणसाने विचारले अहो कालचा ! असे उद्गारलो तर साहेब मला गप्प करत म्हणतात कसे , आज काय तुमचा फोटो येणार होता का ? अहो माझा फोटो पेपरला येत असला असता तर तुमच्या लॉजमध्ये कशाला थांबलो असतो सरळ चांगले 'प्राईड इंटरन्यशनल' गाठले असते , तरी बरे दुसऱ्या दिवशीच्या ' हिंदुस्थान टाइम्स'ला आमच्या अहवालांच्या आधारे एक बातमी होती , फोटो नव्हता हा भाग अलाहिदा , म्हंटले चला नागपुरी झटका तर मिळाला , नागपुरात आल्याचे तेवढे तरी समाधान.

या सर्वानंतर 'आमदार निवासा'तून अर्थसंकल्पातील पुरवणी मागण्यांचे पुस्तक आणणे आणि त्यावर टिपण तयार करणे असा कार्यक्रम होता, अधिवेशनाच्या निमित्ताने केलेली रंगरंगोटी तसेच दादा , तात्या, भाऊ, राव , साहेब यांचे केलेले स्वागत त्यावेळी निदर्शनास आले अर्थात फलकांच्या आधाराने, आणखीन एक उल्लेखनीय फलक होता तृणमूल कॉंग्रेस पक्षातर्फे करण्यात आलेल्या स्वागताचा, ममता दिदींनी काय ज्या राज्यात टाटा तिकडे आपला मोर्चा असे धोरण आखले की काय असे वाटले.

अधिवेशन काळात राज्यभरातून पोलीस येथे बंदोबस्तासाठी येतात , खुल्या लोकशाहीतील कडेकोट कारभार त्यामुळे पासेस शिवाय 'आम आदमीच्या' नशिबी 'आम'दारांची भेटदेखील दुर्लभ होवून गेली आहे. ६ डिसेंबरला आंबेडकरांच्या महापरीनिर्वाणामुळे शासकीय कामकाजाला सुट्टी असल्याने आम्हीदेखील निवांत होतो , फक्त त्या दिवशी रात्री विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्याकडे आमच्या अहवालांचा विधिमंडळात कसा उपयोग करायचा यावर एक मिटिंग झाली.

विधीमंडळासाठीचे पासेस आमच्याजवळ असल्याने आम्ही प्रवेशासाठी पास झालो आणि आतापर्यंत असणारी उत्सुकता अधिकच शिगेला पोहचली कारण आतापर्यंत दुरूनच दर्शन झालेले विधिमंडळ 'याची देही याची डोळा' पहावयास मिळणार होते, प्रत्यक्ष विधानसभेत किंवा परिषदेत बसून चर्चा ऐकण्याचे पास आमच्याकडे नसले तरी आतापर्यंत अनेक आमदारांनी पळवलेला ' राजदंड ' पाहता येईल तसेच सर्व मंत्री , पक्षांची कार्यालये, सभापती, अध्यक्ष यांच्या दालनाचा फेरफटका मारता येईल एवढी मुभा आम्हाला होती आणि याचा पुरेपूर लाभ उठवत आम्ही ' राज्यकारभाराच्या वर्तुळात ' चंचुप्रवेश’ करत होतो. सर्व राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांना भेटून आम्ही आमच्या अहवालांचा सेट त्यांना सुपूर्त करत होतो तसेच काही अभ्यासू आमदारांना देखील आम्ही आमचे अहवाल दिले , काहींनी अहवालाकडे पाहून न पाहिल्यासारखे केले , काहींनी कौतुक केले तर काहींनी खरेच ते अहवाल पाहून त्याविषयीच्या भल्या बुऱ्या प्रतिक्रिया देखील आम्हाला दिल्या तसेच अहवालात आणखी काय सुधारणा हव्या ते देखील सांगितले. याच आवारात लोकशाहीच्या चौथ्या खांबावर लगडणारी आणि नागरिकांना सतत बातम्या पुरवणारी दृक-श्राव्य आणि प्रिंट माध्यमातील अनेक मंडळी भेटली . विधिमंडळात त्या दिवशी 'टोलनाका' या विषयावर चर्चा असल्याने त्या विषयाशी संबंधित कंपन्यांचे PRO देखील आपली बाजू सरकारात बळकट करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक असा भेद विसरून ' टोलनाक्यांचा खुंटा हलवून आणखीन भक्कम करताना दिसली , हे पूर्वी ऐकलेले नागपुरात प्रत्यक्ष पाहता आले.

नागपुरात रामदास कदम यांनी आम्हाला केवळ भेटीचा वेळच दिला नाहीतर दुसऱ्या दिवशीच्या जेवणाचे आमंत्रण देखील दिले , त्याशिवाय एकूणच त्यांची बोलणे चालणे राजकारणी लोकांमधील माणूस म्हणून असणाऱ्या बाजूची झलक दाखवणारी होती .

एक आठवड्याच्या नागपूर मुक्कामात सत्तेच्या वर्तुळात फेरफटका मारत असताना काही समृद्ध करणारे अनुभवदेखील आले, विधिमंडळात मांडले जाणारे प्रशन , त्याची पद्धत , या सर्वांमागील कार्यकारणभाव आणि एकूणच विधीमंडळाचे प्रत्यक्ष कामकाज कसे चालते याचा माझ्या पुढील वाटचालीमध्ये निश्चितच उपयोग होईल, आमच्या अहवालातील माहितीचा प्रत्यक्ष विधिमंडळात योग्य वापर करता यावा यांसाठी विविध संसदीय आयुधांचा गहन अभ्यास गरजेचा आहे हे देखील जाणवले , विशेषत: विधानसभा अध्यक्षांच्या दालनात यांचे महत्व अधिक पटले.

नागपुरातील मुक्कामात विधीमंडळाखेरीज इतरही अनेक गोष्टी नजरेखालून गेल्या , येथे ३ सीटर रिक्शा याचा अर्थ १ ड्रायव्हर आणि ३+२ असावा , प्रत्येक रिक्शामध्ये मागच्या सीटसमोर एक फळी होती त्यावर दोघांनी कसरत करत बसायचे , अगदी पोलिसांच्या नाकाखाली या गोष्टी चालतात थोडक्यात शासकीय इतमामात हे रिक्शावाले ३+२ लोक घेवून फिरतात . एकदा तर खुद्द एका पोलिसाने आम्ही पाच जण पाहून एकच रिक्शा करा उगाच दोन रिक्शा साठी कशाला पैसे घालवता असा 'माणुसकी' ला स्मरून सल्ला दिला, तसेच येथे फिरताना 'चौक ' याचे इंग्रजी रुपांतर करून मुंजे स्क़ेअर , व्हरायटी स्क़्वेअर असेदेखील बस थांबे दिसून आले. नागपुरातील 'सावजी' हा मसाल्यांचा प्रकार येथील संत्र्यांसारखाच प्रसिद्ध आहे, आमची कामे उरकल्यानंतर एके दिवशी 'शुक्रवारी तलाव ' येथील जगदीश उपाहरगृहात आम्ही अभक्ष्य भक्षणावर ताव मारला , या मसाल्याने आमच्या नाका-तोंडातून पाणी काढले हा भाग निराळा मात्र जेवल्यानंतर आमची स्थिती 'मोगाम्बो खुश हुवा' अशी असल्याने त्या पाण्याकडे आम्ही दुर्लक्ष केले .

एकूणच भारताच्या मध्यबिंदूतील हा अनुभव मला माझ्या कामात उच्चबिंदूपर्यंत नेईल अशी आशा करतो आणि ........
सांप्रतयुगे भारतखंडे महाराष्ट्रप्रान्ते मुंबानगरी लिखित नागपूर पुराणाम संपूर्णम अशी इतिश्री करतो .....................

1 comment:

  1. 'अधिवेशनाचा पहिला आठवडा 'गोंधळी' या लोककलेला समर्पित केला पाहिजे या भावनेत सर्व सदस्य असतात'
    ' जेवणाएवढा आवश्यक असणारा पेपर '
    'आतापर्यंत अनेक आमदारांनी पळवलेला ' राजदंड ' पाहता येईल...'
    'राजकारणी लोकांमधील माणूस म्हणून असणाऱ्या बाजूची झलक ...'

    लै भारी भाऊ...
    आत एकदा मराठवाडी झटका किंवा मराठवाड्याचे पुणे - लातूर-अक्ख्यान पण होऊन जाऊद्यात....
    तिकडे सुद्धा असल्या करामती करणारे लोक सापडतीलच...

    ReplyDelete