Tuesday 14 December 2010

ये है मुंबई मेरी जान !!!

मला सांगा मुंबापुरीचे आकर्षण भारतात कोणाला नाही, सर्वसामान्यत: सर्वच 'मध्यमवर्गीय' मुंबईच्या भेटीसाठी आतुर असतात , अर्थात खुद्द मुंबईकर सोडून ,त्यांना कशाला असेल हो आकर्षण कारण जिथे पिकत तिथे विकत नाही म्हणतात हेच खर. पु.लं.नी एका ठिकाणी म्हणल्याप्रमाणे 'मुंबईकराचे नशीब हे घड्याळाला बांधले असते मग अशावेळी सवड मिळणार तरी कशी आणि कधी?' पण म्हणजे त्यांची ईच्छा वा आकांक्षा धुमसत नसते असे नाही,आठवडाखेर लोकल स्टेशन्स ऐवजी मॉल, हॉटेल्स तुडुंब भरून वाहतात हे त्याचेच द्योतक नव्हे का.

नमनाला एवढे घडाभर तेल लावल्यानंतर मुळ विषयाकडे येतो, 'यूपीएससी'च्या वाऱ्या संपल्यानंतर उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविणे गरजेचे होते. एक वर्ष ( नोव्हेंबर २००९ ते नोव्हेंबर २०१० ) विझिटिंग लेक्चररशीप केली , मात्र पोष्टाच तिकीट घट्ट चिकटाव तसा अजून कोठेही चिकटलो नव्हतो. अशा संधीने २०१० हे वर्ष संपता संपता माझे दार ठोठावले आणि मी Socio Political Analysis and Research kendra अर्थात (SPARK - स्पार्क) मध्ये नोव्हेंबरच्या मध्यात 'प्रोग्राम असिस्टंट' म्हणून मुंबापुरीत रुजू झालो. मुंबई तशी मला नवी नाही , १९९९ ला पहिल्यांदा मी या मायानगरीचे दर्शन घेतले होते आणि त्यानंतरदेखील अधून मधून भेटीचा योग येतच होता . विझिटिंग लेक्चररशीपच्या काळात माझ्या 'शनिवार' आणि 'रविवार' चा साक्षीदार हे मुंबई शहर होतेच तरीदेखील मुंबई मध्ये नौकरी आणि राहण्यासाठी येतांना उत्सुकता , आनंद आणि अनामिक भीती यांचे मिश्रण माझ्या मनात होते.

मुंबईला आल्यानंतर इथली अहोरात्र वाहणारी गर्दी पाहून , मुंबईमधील इतर स्थिती-गती पाहून आणि एकंदरीतच वातावरण पाहून या नगरला श्रमशूर नागरी म्हणावे का जादुईनगरी म्हणावे का धावते समालोचन सारखे धावते शहर म्हणावे हा प्रश्न मला पडला. झाड जसे आलेल्या प्रत्येक वाटसरूला निरपेक्षपणे सावली देते तसेच मुंबईला आलेल्या प्रत्येकाला या शहराने काम दिले आहे , हातातोंडाच्या जुळणीची दररोजची भ्रांत येथे मिटत असेलच अशी मला खात्री वाटते आणि त्यामुळेच तर येथे स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या मुबलक आढळते. येथे रु.५ च्या वडापाव पासून रु. ५००० च्या इटालियन पास्त्यापर्यंत खाण्यासाठी सगळे काही मिळते ते देखील २४ तास , VT च्या मागच्या गल्लीत तर जेवण बनवून देणारे खानसामे येतात तेच मुळी रात्री बारा वाजेनंतर.

जेवणाचा प्रश्न सोडविन्यासोबातच आपल्या समाजातील मुख्यत: ग्रामीण भागातील काही अनिष्ट चाली-रितीना ( जात-पात ) कंटाळून आत्मसन्मान टिकवण्यासाठीदेखील (विशेषत: उत्तरेकडील ) दलितवर्ग मुंबईत येत असेल कारण या नगरात श्रमाला जास्त किंमत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामुळेच खेड्यांना अहंकाराची डबकी आणि शहरांना मुक्तीचे द्वार म्हटले होते. स्थलांतरित लोकांच्या संखेत वाढ होण्याचे केवळ तेच एक कारण मात्र नाही, संधींची मुबलक उपलब्धता आणि आपल्यातील क्षमतांना मुंबईच योग्य न्याय देईल असे वाटत असेल त्यामुळेच अनेक लोक येथे दररोज धडकत असतात किंबहुना मुंबईची जडणघडणच त्या दृष्टीने झाली आहे . मुंबईवर पूर्वी मराठे किंवा मुघल यापैकी कोणाचेही राज्य नव्हते , मुंबई निर्माण केली तीच मुळी इंग्रजांनी त्यामुळे पाश्चात्य जगतातील कामसूपणाचा गुणच या नगरीने उचलला असेल बहुतेक !

मुंबईत 'पोटोबा' संतुष्ट होत असला तरी या सतत जागे असणाऱ्या शहरात 'घरोबा' कुठे करावा या प्रश्नाचे उत्तर दस्तरखुद्द 'मुंबादेवी' तरी देवू शकेल काय ? अशी परिस्थिती आहे. जमिनीच्या किमती ऐकून डोळे पांढरे होण्याची वेळ येथे आहे सिमेंटच्या या जंगलात 'वणवण' फिरावे लागले तरी 'वन रूम किचेन ' घर बजेट मध्ये मिळेल याची शाश्वती देता येणार नाही अर्थात या जमिनीच्या सहाय्याने काळ्याचे पांढरे पैसे करणारी बरीच मंडळी या शहरात वावरतात हे देखील तितकेच खरे.

मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल आता माझ्यासाठी देखील श्वासाइतकी अविभाज्य बनलेली आहे कारण मी राहतो ठाण्यात आणि काम करतो वरळीत ( एकूण प्रवास वेळ १.४५ मिनिटे ). आजपर्यंत लोकलमधील लोकांचे ग्रुप्स त्यांच्या गप्पा , गोष्टी, ऋणानुबंध याविषयी केवळ ऐकले होते किंवा पहिले होते आता मात्र त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो आहे. गेल्या एक महिन्यातच लोकलमध्ये माझी जागा धरून ठेवेल असा एक ग्रुप देखील जमला आहे, या सर्वांमुळे मी ठाणे ते वरळी प्रवास एन्जोय करतो आहे , घड्याळ आणि काम यांच्याबाबत जमवून घेतले तरच मुंबईकर होण्यातली मजा अनुभवता येते असे वाटते. सध्यातरी मी मुंबईमध्ये रुळत चाललो आहे ,थोडक्यात मुंबईकर होत जाण्यातली मजा मी ( एक स्थलांतरित) अनुभवत आहे . बघूया पुढे काय होते ते !!!



....आखिर ये है मुंबई मेरी जान !!!

2 comments: