लक्जमबर्ग सिटीचे शेवटचे दर्शन घेवून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. केवळ चाळीस मिनिटात आम्ही जर्मनीतील सर्वात प्राचीन शहरात पोहचलो. ट्रीअरच्या आसपासचा परिसर देखील रोमन काळातील इतिहासाच्या खुणा सांगतच होता. शिवाय,मोझल खोऱ्यातील या शहराच्या आसपास रोमन काळापासून वाईन निर्मितीचे धडे गिरवले जात आहेत. त्यामुळे, शेंबडे पोरही वाईनचे त्यांच्या जगण्यातील महत्व सांगेल. ट्रीअर शहर प्राचीन असले तरी विद्यापीठाचे केंद्र असल्याने तारुण्याने मुसमुसलेले आहे. आजूबाजूचे सदाबहार वातावरण आणि सोमरसाची नशा यामुळे या प्राचीन शहराचे यौवन आनंदाने मदहोश झाल्याचे जाणवत होते. रोमन राज्यकर्त्यानीच ऱ्हाइन-मोझेल खोऱ्यात ही द्राक्ष संस्कृती आणली आहे. पु. ल. म्हणतात त्याप्रमाणे आपल्याकडे रुद्राक्ष संस्कृती आहे तर इकडे द्राक्ष संस्कृती आहे हे तंतोतंत पटते. येथल्या रिस्लीन्ग वाईनचा आस्वाद न घेता वापस फिरणे म्हणजे आग्र्याला जावून ताजमहाल न पाहाण्यासारखे होते. त्यामुळे, तरुणींना न्याहाळत वारुणीचा आनंद घेतला हे वेगळे सांगायला नको...!
या प्राचीन शहरातील एक अर्वाचीन पैलू म्हणजे कामगार क्रांतीचे जनक कार्ल मार्क्स यांचे हे जन्म स्थळ होय. आपल्या आयुष्यातील पहिली सतरा वर्षे त्यांनी याच शहरात काढली. इंटरेस्टिंग म्हणजे, अठराव्या शतकाच्या सुरवातीला औद्योगिक क्रांतीची सुरवात होत असताना धनिक लोकांच्या मुलांना ऱ्हाइन-मोझेल नदीच्या खोऱ्यात धाडले जाई. स्वछंदवादाने साहित्य, कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून धनिक वर्गावर या भागाविषयी मोहिनी घातली होती म्हणलास वावगे ठरू नये. शिवाय व्यक्तीस्वातंत्र्याला जर्मन रोमॅंटिसिझमने अधिक महत्व दिले होते. शिक्षणसोबतच तारुण्यातील जगण्याचा आनंद घेण्यासाठी मदिरामृताची साथ मिळेल अशी कीर्ती या विभागाने मिळवली होती. अशा या भागात धानिकांना आव्हान देणाऱ्या मार्क्सचा जन्म होणे याला दैवी योगायोग म्हणावे का विधात्याने जाणीवपूर्वक आखलेली योजना. अर्थात, मार्क्सच्या बाबतीत दैवी बाबींचा उल्लेख करणे म्हणजे आ बैल मुझे मार असेच आहे, डावी मंडळी कधी आपले लाल डोळे उगरातील हे सांगाता येणार नाही. मार्क्स हाऊसला भेट देवून आम्ही बाजारपेठेचा फेरफटका मारला. त्यानंतर संध्याकाळी, माझ्या विचनी नावाच्या मैत्रिणी सोबत आम्ही डिनरचा कार्यक्रम आखला होता. जिथे परंपरागत जर्मन जेवण मिळेल अशा रेस्टॉरंटला जावूया असे सांगितले होते. तिने Kartoffel नावाच्या रेस्टॉरंटला रेज़र्वेशन केले होते. जर्मन भाषेमध्ये Kartoffel म्हणजे बटाटा. हे जर्मन लोक सगळ्या गोष्टीत बटाटा घालतात. ज्याप्रमाणे दिल्लीला राहिल्यानंतर चहा देखील पनीरचा करतील असे वाटते तसे इकडे कॉफी किंवा बियर बटाट्यापासून करतील अशी भीती मला वाटत असते. पण तशातला काही प्रकार घडला नाही आणि बटाटा सूप सोबत एका कोंबडीचा बळी देवून आम्ही रेस्टॉरंट अटेंडंटच्या Guten Appetit (एन्जॉय द मिल) या शुभेच्छाचा मिटक्या मारत स्वीकार केला. अर्थात सोबत बीयर होतीच, पण बटाट्याचा अंश देखील नसणारी. त्यानंतर, रात्री उशिरा कोबलेंझची ट्रेन गाठण्यासाठी केलेली कसरत आणि गावठी कुत्रा मागे लागल्यावर केलेली धावपळ यात साम्य सापडल्यास नवल ते काय?
दुसऱ्या दिवशी सकाळी, ब्रेकफास्ट साठी क्रॉन्झा, चिझ केक आणि कॉफी गट्टम केली आणि बिंगेनला जाणारी गाडी पकडली. कोबलेंझ ते बिंगेन या मार्गाचा कल्चरल लॅंडस्केप म्हणजेच मानव आणि नैसर्गिक रचना यांचे संयुक्त प्रयत्न जगविख्यात आहेत. या पश्चिम ऱ्हाइन रेल्वेच्या या 65 कि. मी. मार्गाला 2002 मध्ये यूनेस्कोने हेरिटेज दर्ज दिलेला आहे.या मार्गावर किमान चाळीस राजवाडे आहेत आणि सभोवती हिरवागार गालीचा. सुदैवाने त्यादिवशी ऊन असल्याने त्या कल्चरल लॅंडस्केपने आमच्या स्वागतासाठी आपले दोन्ही हात मोकळे सोडून रंगांची उधळण केली होती. ती मनाला स्पर्शून गेलीच. कोबलेंझ ते बिंगेन हा नैसर्गिक नयनरम्य पट्टा जर्मन स्वछंदवादी (रोमॅंटिसिझ) चळवळीचे अविभाज्य भाग आहे. विशेष म्हणजे, गंभीर इंग्लिश रोमॅंटिसिझपेक्षा जर्मन स्वछंदवाद वेगळा आहे. विनोद आणि सौन्दर्य यांचा मिलाफ येथे पहायला मिळतो. त्यातील, सौंदर्य विल्यम टर्नर यांनी चितारलेली चित्रे, महान जर्मन साहित्यिक आणि राजनीतिज्ञ गटे (तोच ज्याच्या नावे जर्मन भाषा शिकवणारी इंस्टिट्यूट आहे, स्पेलिंग नुसार ज्याला गोथे म्हणावे लागेल, अशा आडनावाचा आणि कालिदासांचे ‘शाकुंतल’ डोक्यावर घेवून नाचलेला हा जर्मन कवी ! ) आणि श्लेगेल बंधु यांच्या लिखाणातून तसेच कोबलेंझ ते बिंगेनच्या भागातून प्रतिबिंबीत होते हे ऐकले होते हे शब्दश: खरे ठरले.
व्हिडिओ: कोबलेंझ ते बिंगेन रूटबिंगेनला पोहचताना आपल्याला ऱ्हाइन नदीच्या मधोमध उभे असलेले माऊस टॉवर दिसतो. मानवी क्रूर कृत्याला दिलेली शिक्षा म्हणून हा टॉवर उभा आहे. येथील लोककथा सांगते की, हजार वर्षापूर्वी हातो ll राजाने गरीब शेतकऱ्यांना जाळून मारले आणि त्यांच्या ओरडण्याला उंदरांचे रडणे असा हिणकस शेर मारला. रात्री, हातो ll वर अनेक उंदरांनी हल्ला केला. त्यामुळे, बोटीतून हा राजा ऱ्हाइनच्या मधोमध उभ्या टॉवर मध्ये येवून थांबला. उंदीर पाण्यातून येवू शकणार नाहीत असे त्याला वाटले पण काळ आणि वेळ दोन्ही आल्याने उंदीर या टॉवर मध्ये शिरले आणि त्या राजाला जिवंतपणे खाल्ले. असो, माऊस टॉवर सोडले तर इतर सर्व भाग म्हणजे मानवी आणि नैसर्गिक सकारात्मक भावनेचे चित्रण होय !
व्हिडिओ: माऊस टॉवर आणि रेल्वे
येथील रॉबर्ट क्लोप राजवाडा 1240 मध्ये बांधण्यात आला आहे. स्वछंदवादी चळवळीच्या वेळी हा राजवाडा सहलींचे आकर्षण केंद्र होता. उंचावर वसलेल्या या जागेच्या आवारातून निसर्गाचा मिळणाऱ्या देखाव्यामुळे हा राजवाडा तत्कालीन लेखक आणि इतर कलाकारांसाठी विंटेज पॉइंटच होता.
फोटो: रॉबर्ट क्लोप राजवाडया वरून बिंगेन गावचा परिसर
त्यानंतर आम्ही दृसुस ब्रिजचे दर्शन घेतले. हा पुल म्हणजे रोमन साम्राज्याचा अस्त (इसवी सन 5 वे शतक) ते युरोपियन प्रबोधनाचा काळ (13 वे शतक renaissance)चा मुक प्रेक्षक आहे. त्याकाळातील जर्मनीतील हा एकमेव दगडी बांधणीचा पुल होय. हे सर्व पाहिल्यानंतर मनाची भूक भागली होती पण पोटाचे काय? हा प्रश्न पुन्हा उसळी मारून येत होता. त्याचे उत्तर गावातील बाजारपेठेपासून थोड्याशा दुरवरच्या रस्त्यावरील एका आशियाई हॉटेलमध्ये मिळाले. येथील चायनीजची चव तर मला भारताचे स्मरण देवून गेली. तृतीचा ढेकर देवून आम्ही पुन्हा कोबलेंझच्या वाटेला लागलो. संध्याकाळी 6.15 ची रेल्वे नित्याप्रमाणे उशीराच आली. दोन तीन दिवसांचा प्रवासाचा शीण सोबत घेवूनच आम्ही गाडीत चढलो. गाडीने वेग घेतला आणि थकव्यामुळे आम्ही दोघेही शांतपणे सीटवर बसून गेल्या दोन दिवसातील क्षणांची मनातल्या मनात उजळणी करू लागलो. थोड्यावेळाने बर्गर आणि क्रॉन्झा पोटात रिचवून हॅम्बुर्गची वाट पाहू लागलो. रात्री उशिरा हॅम्बुर्गच्या स्टेशनवर गाडी पोहचली. त्यानंतर घरी पोहचून रोजच्या चाकारित रुजू होण्याची अनिच्छा मागे सारीत निद्रादेवीची आराधना सुरू केली.
समाप्त !
पहिला भाग वाचण्यासाठी येथे टिचकी मारा : सफर ऱ्हाइन आणि मोझेल खोऱ्याची ! भाग पहिला
No comments:
Post a Comment