Sunday 5 February 2023

सफर ऱ्हाइन आणि मोझेल खोऱ्याची !

 

 

Deutsch Eck, Koblenz  

फोटो सौजन्य : https://www.romantischer-rhein.de/a-deutsches-eck-mit-kaiserdenkmal

भाग 1

जर्मनीत येवून आता पावणे दोन वर्ष होत आहेत तरी येथील प्राचीन इतिहासबाबत फारशी माहिती मिळाली नाही. लोकांशी बोलतानाही पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध यांचेच उल्लेख प्रकर्षाने येतात. त्यावेळी आमच्या शहरात कसे बॉबिंग  झाले यांची रोमहर्षक कहाणी खूपदा ऐकायला मिळते. परंतु, शाळेत असताना  जर्मनीतील निअँडर खोऱ्यात ‘निअँडरथल’ मानवाच्या पाऊलखुणा सापडल्याचे ऐकिवात होते. साधारणत: चाळीस हजारवर्षापूर्वीच्या द्वीपाद प्राण्याविषयी अधिकची माहीत मात्र मिळत नाही. त्यामुळे गुगल बाबाला शरण गेलो. त्यावेळी, ट्रीअर हे शहर जर्मनीतील सर्वात प्राचीन शहर असून, तत्कालीन रोमन साम्राज्याचा मुकुटमणी असण्याचे नमूद करण्यात आले. रोमन जनरल ज्यूलिअस सीझरच्या काळात ऱ्हाइन नदीच्या पूर्वेला राहणाऱ्या लोकाना ‘जर्मनिया’ म्हणत असत. ऱ्हाइन-मोझेल नदीचे खोरे म्हणजे जर्मन सोमरस आणि रोमॅंटिसिझमचे उगमस्थान. संस्कृतीविषयी अभिमानामुळे जर्मन लोक अधिक राष्ट्रवादी असल्याचे या देशात राहिल्यावर जाणवतेच. त्याचे उगमस्थान या रोमॅंटिसिझम मध्ये शोधता येते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ऱ्हाइन आणि मोझेल खोरे धुंडाळण्याची संधी मिळाली ती देखील बायको आणि मुलाशिवाय. म्हणजे क्रिकेट मधली फ्री-हिटच मिळाली होती. सोबत केवळ मित्रवर्य जितेंद्र होता.    

अजूनही, शिशिर ऋतु (हिवाळा) असल्याने सूर्यदर्शनासाठी आठ वाजण्याची वाट पहावी लागते. शिवाय, युरोपमध्ये हिवाळ्यात या उगवत्या भास्कराचे दर्शन नाशिबानेच मिळते. जर्मन रेल्वेच्या (Deutsch Bahn) कृपेमुळे गाडी गाठण्यासाठी अगदी ब्राम्ह मुहूर्त नसला तरी पहाटेच घर सोडले. कारण सकाळी पावणे सात वाजता असणारी गाडी आता सहाला निघणार असल्याचे कळले. ऱ्हाइन-मोझेल खोरे पाहण्यासाठी आम्ही कोबलेंझला थांबणार होतो. गाडीत गर्दी नव्हती. खरे तर इतरवेळी हे चांगलेच पण केवळ मित्रासोबत प्रवास करताना गाडीतील ‘प्रेक्षणीय स्थळांशिवाय’ हा प्रवास म्हणजे, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, अशी अनुभूती आली. त्यामुळे, जितेंद्रशी गप्पा सुरू झाल्या. जितेंद्रसोबत नुकतीच ओळख झाली होती. हॅम्बुर्गला गाडीत बसल्यानंतर त्याची कहाणी ऐकल्यानंतर चित्रपटसृष्टीतील जितेंद्रने वठवलेल्या अनेक भूमिकांचा भास होत होता. पुलंचा सखाराम गटणे जगण्याला जीवन म्हणत असे, जितेंद्रची ‘जीवन’कहाणी काहीशी तशीच होती. गाडीचे रुळ जसे बदलत होते तसे आमचे संभाषणाचे संदर्भ बदलू लागले. बॉन येई पर्यंत गाडी चाळीस मिनिटे उशिराने चालत होती. जर्मन एकीकरणापूर्वी बॉन ही पश्चिम जर्मनीची राजधानी होती. बॉन ते बिंगेन रेल्वे प्रवास नितांत निसर्गरम्य आहे. निसर्गाने केलेली उधळण पाहण्यासाठी, जर्मन सरकारने रेल्वे आणि रस्ता महामार्गाची सुविधा केली होती. त्यामुळे रेल्वेच्या बाजूला रस्ता आणि त्याच्या पलीकडे संथ वाहणारी ऱ्हाइन असे नयनसुख बॉन ते कोबलेंझ पट्ट्यात उपभोगले आणि गाडीत प्रेक्षणीय स्थळे नाहीत याचा विसर पडला होता.

काही वेळातच कोबलेंझला पोहचला. शहर छोटेखानी असल्याने जवळपास सगळीकडे पायच सोबती होते. अर्थात ते नंतर ध्यानात आले, त्याआधीच आम्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सिटी तिकिटाचा भुर्दंड माथी मारून घेतला. हॉटेलवर सामान आपटून आमची स्वारी ऱ्हाइन-मोझेल यांचा संगम आणि  Deutsch Eck (जर्मन कोपरा) पाहण्यासाठी पायपीट करत निघाली.  लहानपणी ‘प्रयागराज’ येथील त्रिवेणी संगमात डुबकी मारून भविष्यातील पाप धुण्याचे इन्शुरन्स काढून ठेवले होते. Deutsch Eck चा संगम मात्र सुखद धक्का देवून गेला. या संगमावर 1897 मध्ये जर्मन सम्राट विल्यम यांचा अश्वारूढ पुतळा आहे. दुसऱ्या महायुद्धात या पुतळ्याचे मोठे नुकसान झाले होते. तद्नंतर 1953 ते 1990 पर्यंत या पुतळ्यासमोरील जागा जर्मन एकीकरणाचे स्मारक म्हणून वापरण्यात येत असे. 1991 नंतर ही जागा एक महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून उदयाला आले आहे. संगमापासून Ehrenbreitstein किल्ल्यावर जाण्यासाठी केबल कार आहे मात्र थंडीचा कडाका असल्याने आणि सुट्ट्या नसल्याने किल्ल्याचे दरवाजे बंद होते. अशावेळी आमच्यासाठी दरवाजे उघडण्यासाठी आम्ही काही किल्लेदार नव्हतो. त्यामुळे यूनेस्कोचा दर्ज मिळालेला तो किल्ला पाहण्याचा योग हुकलाच. संगम दर्शनानंतर शहरातील हिस्ट्री कॉलमला भेट दिली. त्या स्तंभावर, रोमन काळापासून दुसऱ्या महायुद्धापर्यंतचा इतिहास कोरण्यात आला आहे. जर्मन लोकांची आपल्या ऐतिहासिक वस्तूची जपवणूक करण्याची वृत्ती वाखाणण्याजोगी आहे. कोबलेंझ सारख्या छोट्या शहराचे देखील गीत आहे आणि त्या गीतकाराच्या, जोसेएफ कोर्णेल्युइस, स्मरणार्थ जुन्या शहरात एक पुतळा उभारण्यात आला आहे. या सर्व जागा एकमेकांपासून साधारण किलोमीटर अंतरावर होत्या. नाही म्हणले तरी 4 ते 5 किलोमीटर चालणे झाले होते. त्यामुळे आमचे पाय बोलायला लागले होते. शेवटी, दुसऱ्या दिवशी ट्रीअर आणि लक्जमबर्ग सिटीच्या भेटीविषयी स्वप्नरंजन करता करता केंव्हा निद्रादेवीच्या आधीन झालो ते कळले देखील नाही.                               

कोबलेंझ ते लक्जमबर्ग सिटी हे अंतर साधारणत: 175 किलोमीटर आहे. त्यासाठी, सकाळी 9 वाजता आम्ही कोबलेंझ वरून ट्रीअर साठी निघालो, या प्राचीन शहरात आम्ही दुपार नंतर पर्यटनासाठी येणार होतोच. ट्रीअरहून लक्जमबर्ग सिटीला आम्ही 45 मिनिटात पोहचलो. युरोपियन युनियन मध्ये सीमावर्ती भागातील सार्वजनिक व्यवस्था एकेमएकांशी संलग्न असल्याने वेगळे तिकीट काढायची झंझटच नसते. लक्जमबर्ग या चिमुकल्या देशाच वैशिष्ठ्य म्हणजे, दरडोई उत्पन्नात या युरोपियन देशाचा जगात पहिला नंबर आहे. जर्मनीचे उत्पन्न 60 ते 65 हजार डॉलर्स आहे तर लक्जमबर्गचे त्याच्या दुप्पट. जर्मनी, फ्रान्स, बेल्जियम या मोठ्या युरोपीयन भावंडांच्या मध्ये लक्जमबर्ग स्थिरावला आहे. अर्थात, या देशात कॉस्ट ऑफ लिव्हिंग प्रचंड आहे. हॅम्बुर्गला एक बियरचे कॅन साधारण 70-80 सेंटस ला मिळते इकडे त्यासाठी तब्बल 2.50 युरो मोजावे लागतात. त्याची झळ आम्हालाही सोसावी लागली. या देशात सर्वत्र वाय-फाय आणि सार्वजनिक वाहतूक मोफत आहे. आजच्या काळात एकवेळ प्यायला पाणी उशिरा मिळाले तरी चालते पण वाय-फाय पुरवणाऱ्याला देव्हाऱ्यात बसवायला लोक कमी करणार नाहीत. अशा लोकांसाठी लक्जमबर्ग म्हणजे नंदनवनच म्हणावे लागेल. अर्थात त्यामुळे देशात कर देखील मोठ्या प्रमाणावर आकाराला जातो.

लक्जमबर्ग सिटी हे राजधानीचे शहर पठार आणि खोलगट भागातून वसले आहे. त्यामुळे शांतपणे वाहणारे पाण्याचे झरे आणि सभोवती असणारी वृक्षराजी यांनी हे शहर एखाद्या अप्सरेप्रमाणे नटलेले आहे. या शहरातील सर्वात आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे सतराव्या शतकात केलेली तटबंदी. अत्यंत सुंदर अशी नैसर्गिक प्राकृतिक रचना आणि मानवी प्रयत्न यांचा  संयोग म्हणजे ही बाल्कनी होय.  त्यामुळेच, या तटबंदीला युरोपातील सर्वात सुंदर बाल्कनी म्हणून ओळखतात. त्याच्या पुढे आम्ही शहराचे उंचावरून अवलोकन करण्यासाठी तयार केलेल्या एका  लिफ्टच्या शोधार्थ निघालो. काचेचे हे घर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या Pescatore park ला अलझेट नदीच्या खोऱ्यातील Pfaffenthal भागाशी जोडते. 71 मीटर उंचावर पोहचल्यावर खाली पाहताना ‘टिक टिक वाजते डोक्यात, धड धड वाढते ठोक्यातयाची आठवण आल्याशिवाय राहिली नाही. आमची उडलेली त्रेधतिरपिट पाहून तेथे असलेल्या इतरांची  निश्चितच  करमणूक झाली असेल.  शेवटी त्या जाहिरातीतील डर  के आगे जीत है ! हा मंत्र आठवून मी अधांतरी असलेल्या त्या काचेच्या पट्टीवर उभा राहिलो. त्या ठिकाणाहून लक्जमबर्ग सिटीचे झालेले दर्शन शब्दात मांडत येणे केवळ कठीण आहे. त्यानंतर, शहरातील बाजारपेठ, गोल्डन लेडीचा स्तंभ आणि रोमन काळातील पूल यांचा न्याहाळत आणि या शहराला सायो नारा केले ! 

 

क्रमश:

No comments:

Post a Comment