Saturday 11 September 2010

तो प्रवास आणि ती भेट .............













आज बरयाच दिवसांनी लातूर ला जाण्यास निघालो , पाहतो तर काय विश्व त्र्यव्ह्ल्स ची गाडी हाउसफुल , शेवटी काय वाट पाहीन पण एस. टी. नेच जाईन ! वर भरोसा ठेवला आणि शिवाजी नगर गाठले. स्थानकावर हि तोबा गर्दी प्रत्येक जन आजच गावाला जाण्याचा शुभदिन असल्याचे दाते पंचागात पाहून आलेला. तसा मी गर्दीला भिणारा माणूस नाही , गेली १० वर्षे पुण्यासारख्या महानगरात राहत असल्याने गर्दी नवीन नव्हती, मात्र आता 'पुणेकर' बनल्याने कधीतरी 'गणपती उत्सवालाच' जास्त गर्दीची सवय , मुंबैकरासारखे 'रात्रंदिन आम्हा गर्दीचा प्रसंग 'नसतोच त्यामुळे वैतागलेला होतो.

अर्थात त्या गर्दीमध्येही झूळूकेसारखी वाटणाऱ्या गोष्टी म्हणजे आजूबाजूची 'प्रेक्षणीय स्थळे' होय आणि डोळ्यांनी लहानपणापासून प्रशिक्षण आत्मसात केले असल्यासारखे आपली शोध मोहीम चालू केली (By Default ). बस स्थानकावर गाडीची 'प्रतीक्षा' करत असताना एका 'प्रेक्षणीय स्थळाने ' माझी नजर वेधून घेतली होती. स्थानकावर असणारा गोंगाट, तिकीट बुकिंगची घाई या नादात तिच्याकडे थोडावेळ दुर्लक्ष झाले , मात्र ते तिकीटचे सोपस्कार संपवून मी लाईन मधून बाहेर आल्यावर परत नजर फिरवली तर 'ओडके बोडके' स्थानकच दिसू लागले म्हणजे, ती गेली तर हात्तीच्या ! म्हणले आणि डोके पेपरात घातले.

एवढ्यात " अहो! ४ वाजताची लातूर 'एशियाड' येथेच लागणार ना! "
असा मंजूळ स्वर कानी पडला.
आता मुलींशी बोलायची सवय असली तरी एक अनोळखी मुलगी डायरेक्ट मलाच विचारते म्हणल्यावर धक्का बसणारच ना हो , अर्थात गोड !


"हो , हो याच ठिकाणी लागते मीही त्याच गाडीची वाट पाहतो आहे" मी तिरपा कटाक्ष टाकत बोललो .

अर्रे हे तर मघाचच हिरवळीमधले गोड फुल होते आणि 'दुरून डोंगर साजरे' या म्हणीला अक्षरश : खोट ठरवणारी ती होती .


मी आता एस . टी च्या आणखी एका प्लस पोइन्ट चा विचार केला एस. टी मध्ये खाजगी त्र्यव्ह्ल्स सारख 'महिला आरक्षण' नसते त्यामुळे हि सुंदर 'बाला' बस मध्ये माझ्या शेजारी आली तर ......धमालच ! काय मित्रांनो बरोबर ना... तिला पाहताच अत्रेंच्या 'लग्नाची बेडी' नाटकातील परागच्या काव्यपंक्ती मनात चमकून गेल्या ---


ती पाहताच बाला ! कलिजा खलास झाला
छातीत इश्क़ भला ! तो आरपार गेला
....


४.३० ला IST पाळुन गाडीचे आगमन झाले. मी धडपडत जावून जागा पकडली , ९ नंबरची खिडकी शेजारील जागा मिळाल्याने मी खुश होतो , १० नंबर वर कोण येईल याचा विचार देखील मी थोडावेळ केला नाही. थोड्याच वेळात गाडीने शिवाजी नगर स्थानकाबाहेर प्रस्थान केले , त्या कोंडवाड्यातून बस बाहेर काढणाऱ्या प्रत्येक बसचालकाचा जाहीर सत्कार करायला हवा या मताचा मी आहे .


" खिडकी बंद करता का ? वाऱ्याचा त्रास होतो आहे" या वाक्याने मी भानावर आलो


" आयला कोण रे ! " म्हनणार होतो

कारण मी खिडकी बाहेरील 'रम्य' पुणे पाहण्यात गुंतलो होतो एव्हढ्यात ध्यानात आले कि हि मघाचीच बाला , त्यामुळे माझेच ध्यान कसे दिसते ते मी चाचपू लागलो , खिडकी बंद करूनच. आता एवढा मणिकांचन योग आला म्हणल्यावर माझ्या विचारशलाका तिच्याच भोवती रुंजी घालू न लागल्यास नवल


"लातुरलाच चालला का आपण" तिने विचारले मी सकारात्मक मान डोलावली आणि तुम्ही ? असा प्रश्नार्थक चेहरा केला "मी सुद्धा" ती उत्तरली मनात म्हंटले चला म्हणजे शेवट पर्यंत सोबत होईल. गाडी पुण्याबाहेर पडेपर्यंत ती 'बाला' आणि बसमधील इतर सहप्रवासीदेखील निद्रादेवीच्या अधीन झाले. पु. . नी त्यांच्या 'म्हैस' कथेत म्हणल्याप्रमाणे अशावेळी एस. टी तर्फे चालक जागा होता आणि जनतेतर्फे मी !

दीड तासानंतर गाडी चौफुल्याच्या धाब्यावर चहापाण्यासाठी थांबली आणि मानव हा सजीव प्राणी असल्याची जाणीव सह्प्रवास्यांच्या हालचालीमुळे झाली , वीस मिनिटाच्या थांब्यानंतर , प्रवाश्यासारखे गाडीला ही आता हुशारी वाटू लागली होती त्यामुळे तिने वेग घेतला . माझ्या बाजूची सहप्रवासी देखील आता जागृत अवस्थेत आली होती काहीतरी बोलायला सुरु करायचं म्हणून विचारले

" काय करता आपण "


लातुरला IDBI बँकेत probationary ऑफिसर आहे , इति कन्या . आपले impression पडण्यासाठी आम्ही देखील आमचे बँकिंग संबधित इकॉनोमिक्स चे ज्ञान उधळले आणि चर्चेला सुरवात केली , मात्र फार वेळ अर्थशास्त्रावर चर्चा केली तर आपला वांदा व्हायचा म्हणून चर्चेचा सांधा बदलून साहित्य, चित्रपट या जमेच्या क्षेत्रावर आणला आणि विचारले


"विनोदी साहित्य आवडत असेलच ना ?" होकारार्थी उत्तर आल्याने हुरूप आला आणि आम्ही चि. वि. जोशी , अत्रे, पु. ल. देशपांडे यांना वळसा घालून सांप्रत विनोदी साहित्यातील काही सन्माननीय अपवाद वगळता इतरांवर तोंडसुख घेतले .

चित्रपट हा हि विषय आम्हा दोघामधील समान दुवा ठरला , त्यावर आम्ही मनसोक्त चर्चा केली, एवढा वेळ बोलण्यात घालवल्यानंतर नावांची अदलाबदल झालीच आणि आमची चर्चेचि गाडी एस. टी प्रमाणेच वेगवेगळ्या थांब्यांना शिवून वेगवेगळी वळणे घेवू लागली. या सर्व चर्चे दरम्यान मी एक दोनदा स्वतः ला चिमटा घेवून पाहिलं कारण एवढा कलिजा खलास करणारी हि 'बाला' माझ्याशी सुखनैव बोलत होती .
बाहेर पहिले तर लक्षात आले गाडीनेही आता बराच वेग घेतला होता आणि 'बार्शीला गाठले होते म्हणजे आम्ही गेले ३ ते ४ तास एकमेकांशी चर्चेत घालवले होते. बार्शी आल्यानंतर 'बार्शी लाईट ' रेल्वेचा गुण असेल पण आमची चर्चेची गाडी त्या लाईट रेल्वे सारखी धीमी झाली.

आता जसे जसे लातूर जवळ येवू लागले तसे माझे मन बेचैन होवू लागले .... कारण आता हिचा लाभलेला स्वप्नवत सहवास विरून जाणार लवकरच , इतक्यात

"तुमचा मोबाईल नंबर मिळेल का ? " असा मंजुळ प्रश्न माझ्या कानाजवळ किणकिणला


माझी तत्परता उतू जात होतीच मी लगेच नंबर देवून टाकला , यानंतर नवीन तंत्रज्ञान, त्याचे फायदे-तोटे यावर एक बौद्धिक झाले आणि आम्ही सोशल नेट्वर्किंग वर येवून विसावलो . ओर्कुट, फेसबुक वर comments मारून आतापर्यंत 'स्क्र्यप ' चा 'भंगार ' आणि 'वॉल' चा' भिंत ' असा अर्थ महित असणारे आम्ही जग भलतेच techsavy बनले आहे या निष्कर्षाप्रत येवून पोहचलो.

आता लातूर देखील दृष्टीपथात आल होत , त्यामुळे बस मधील हालचाल वाढली होती आम्ही देखील आमच समान आवरू लागलो . आमची गाडी 'महसूल कॉलनी stop ' ला थांबली आणि

" चला भेटू परत कधीतरी" असे निरोपाचे वाक्य बोलून ती 'बाला' बसमधून खाली उतरली


या सर्व गडबडीत तिचा contact number , पत्ता घेण्याचे विसरूनच गेलो. आलेली संधी दडवणे हा मुळी मुलींच्या बाबतीतला स्थायीभावच बनून गेला आहे आणि म्हणूनच मी अजूनही 'एकटाच' आहे असा विचार करत असतानाच एका अनोळखी नंबर वरून एक SMS आला


" thanks for कंपनी, एस. टी चा प्रवास सुखकर झाला , परत भेटू नक्की "


आयला मी उडालोच !

.
.
.
.
.
आजही वाट पाहतोच आहे भेटीची ....................!

4 comments:

  1. Wah wah wah..Khatarnak!!!
    Kalakar Bhavthankar..

    ReplyDelete
  2. jamtay ki Aniketrao...!!!!
    zakkasach...

    ReplyDelete
  3. lai bhari re!! tujha he marathi lekhan kaushallya lai awadla baraka aaplyala rao!! :) ;)

    ani ho ha kissa wachtana majhya sobat zalelya ashyach eka vinodi kisshyachi aathvan mala zaali... ani "या सर्व गडबडीत तिचा contact number , पत्ता घेण्याचे विसरूनच गेलो. आलेली संधी दडवणे हा मुळी मुलींच्या बाबतीतला स्थायीभावच बनून गेला आहे आणि म्हणूनच मी अजूनही 'एकटाच' आहे " he mala tantotant patla bara ka... :D

    ReplyDelete